अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार – किरीट सोमय्या


मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सीआरझेडमध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला हा रिसॉर्ट तोडण्यासाठी ५-७ जानेवारीला आदेश येतील, असे वक्तव्य केले आहे. तसेच तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचा इशाराही टीव्ही ९ मराठीशी बोलताना सोमय्यांनी दिला.

किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परब यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खूप खोटेनाटे प्रयत्न केले. शेवटी अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची नोटीस पर्यावरण मंत्रालयाने पाठवली आहे. १७ डिसेंबरच्या या नोटीसला ३ जानेवारीपर्यंत उत्तर द्यायचे आहे. मला विश्वास आहे की ५-७ जानेवारीला महाराष्ट्र सरकारकडे अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश येतील.

फक्त अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेल असे नाही. त्यापुढे जाऊन आम्ही आणखी विभागांमध्ये तक्रारी केल्या आहेत. हे पैसे कुठून आले? स्वतःच्या नावावर मंत्री म्हणून थ्री फेज कनेक्शन घेतले. बेकायदेशीर बांधकाम केले. मंत्री, आमदार सीआरझेडमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतो. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशीही आमची पुढील याचिका असेल, असा इशारा सोमय्यांनी अनिल परब यांना दिला.

तोडकामाचे आदेश आले की महाराष्ट्र सरकार किती लांबवते हे पाहू. पण, तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे किरीट सोमय्या पुढे म्हणाले.

सध्या उद्धव ठाकरे यांचे १८ नेते आणि मंत्री यांची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. एकूण २८ घोटाळे बाहेर आले आहेत. दर आठवड्यात एक-एक घोटाळा बाहेर येणार याची मी खात्री देतो. पुढील ४ घोटाळे एका महिन्यात उघड करणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले.