नगर जिल्ह्यातील एका शाळेत १९ कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्याने खळबळ


अहमदनगर – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने गेल्या काही दिवसांपासून जगभरात भितीचे वातावरण निर्माण केले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव आता भारतासह महाराष्ट्रात देखील होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या देशात ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत ५वी ते १२वी पर्यंत वर्ग असून ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचेही अधिकाऱ्यांने सांगितले.

याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे गेल्या तीन ते चार दिवसांत आढळून आले आहे. सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक संक्रमित विद्यार्थ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तर काहींमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसत होती.