सीडीएस बिपिन रावत यांचे वडिलोपार्जित गाव दत्तक घेणार लातूरमधील एनजीओ


लातूर – भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे तामिळनाडूमध्ये ८ डिसेंबरला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील एका एनजीओकडून त्यांचे वडिलोपार्जित गाव दत्तक घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पौरी गढवाल जिल्हा अधिकाऱ्यांनी सैंज गावात विकास उपक्रम राबविण्याची परवानगी लातूरमधील डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानला (HBPP) दिली आहे. या गावात योग्य रस्ते नसल्यामुळे गावकऱ्यांना अडचणी येत आहेत. एचबीपीपीचे संस्थापक निवृत्ती यादव म्हणाले, की पुढील आठवड्यात ते सैंज गावाला भेट देऊन तेथील भूभागाची माहिती घेतील आणि तेथील विकास उपक्रमांचे नियोजन करतील.

पीटीआयशी बोलताना निवृत्ती यादव म्हणाले, एचबीपीपी स्वतःच्या संसाधनांचा वापर करून आणि आरोग्य आणि शिक्षण सुविधा उभारण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारची मदत घेईल. तर, एचबीपीपीद्वारे गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सैंज गावाला स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी भेट देतील आणि तेथे होणाऱ्या विकास उपक्रमांचा आराखडा तयार करतील. गावात विकासकामे करण्यास ही एनजीओ इच्छूक आहे, असे आपण जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवले असल्याचे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पीटीआयला सांगितले.

जिल्हा दंडाधिकारी विजय कुमार जोगदंडे यांनी एचबीपीपीच्या संस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्हाला नियमानुसार, पौरी गढवालमधील सैंज या देशाच्या शूर सुपुत्र जनरल बिपिन रावत यांच्या वडिलोपार्जित गावात विकास उपक्रम राबविण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून एचबीपीपी सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्यांनी जेव्हा २०१३ साली केदारनाथ पूर आला होता, तेव्हा उत्तराखंडमध्ये मदत सामग्री देखील पाठवली होती.