अजित पवारांचे राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी पत्र ; राज्यपाल कोश्यारी म्हणतात…


पुणे – मराठी भाषेला “अभिजात” दर्जा मिळावा, यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र पाठवले आहे. तर, आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी भाषेच्या मुद्य्यावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल पिंपरी-चिंचवड येथे एका कार्यक्रमास आले असता, त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मराठी एवढी समृद्ध भाषा आहे. तिला तुम्ही कोणते स्थान द्या न द्या, अभिजात बोला न बोला…पारिजात बोला त्याने काही होणार नाही. मराठी भाषा स्वतःमध्ये अतिशय समृद्ध भाषा आहे, अतिशय समृद्ध साहित्य आहे, आपल्याला त्यावर गर्व असला पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येकाला आम्ही म्हटले आहे की मराठीचा वापर करा. व्यासपीठावर सर्वजण भाषण मराठीत देत होते, ते मला समजत होते.


तर, मा. राष्ट्रपीत महोदय, नमस्कार… भारत सरकारने २००४ साली भाषांना “अभिजात” भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. ह्याला आता सात वर्षे उलटून गेली. साहित्य अकादमीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात येणे गरजेचे आहे. मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी, धर्मभाषा आणि लोकसभाषा म्हणून जागतिक भाषांमधील अग्रणी भाषा आहे. ह्या संदर्भातील अनेक पुराव्यांनी हे शाबित होते की मराठी ही अभिजात भाषा आहेच. तरी कृपया मराठीला तो दर्जा द्यावा, अशी आपल्याला नम्र विनंती असल्याचे राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लिहिलेले आहे.

मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत सहभाग घेतला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. सोबत त्यांनी पत्र देखील जोडले आहे.