विदेशी मद्याच्या किमती ५० टक्क्यांनी कमी करण्यावर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण


मुंबई – महाविकास आघाडी सरकारने गेल्या महिन्यात विदेशी मद्याच्या किमती ५० टक्क्यांनी कमी केल्यामुळे विदेशी मद्याची तस्करी रोखली जाऊन विक्रीत वाढ होईल असे सांगण्यात आले होते आणि राज्याच्या महसुलात वाढ होईल, असा दावा राज्य सरकारने केला होता. आयात केल्या जाणाऱ्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात राज्य सरकारने ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर राज्यात विकल्या जाणाऱ्या किमतीतच आता महाराष्ट्रातही विदेशी मद्य मिळत आहेत. विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.

याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. सरकारने पेट्रोलचे दर कमी न करता दारुवरील दर कमी केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विदेशी मद्याच्या किमती ५० टक्क्यांनी कमी केल्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी इंदिरा गांधी यांच्या काळातील एक घोषणा सांगितली. दारुवरील कर तुम्ही कमी करता आणि पेट्रोल डिझेलवरील कर कमी करत नसल्याचे म्हटले. मला राज्यातील जनतेला सांगायचे आहे की, आपल्याकडे परदेशी आयात मद्यावर ३०० टक्के कर होता. त्यामुळे २०१९-२० मध्ये कराच्या माध्यमातून सरकारला फक्त १०० कोटी मिळाले होते. आम्ही पाहात होतो की, लोक दिल्लीवरूनच चार पाच ७५० मिलीच्या बाटल्या घेऊन येत होते. त्या बाटलीची किंमत दिल्लीमध्ये ३००० हजार, तर महाराष्ट्रात ५७६० रुपये होती. त्यावर कर मिळतच नव्हता. त्यानंतर आता १५० टक्के कर केल्यानंतर असा अंदाज आहे की, २०० कोटी रुपये त्यातून मिळतील. त्यामुळे त्यातून काही नुकसान झालेले नाही उलट कर वाढलेला आहे. परदेशातील आयात मद्याचे आपल्या राज्यातील दर हे इतर राज्याप्रमाणे होतील अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मद्य तस्करीला दर कमी झाल्यामुळे आळा बसणार आहे. तसेच बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार यालाही आळा बसेल. तसेच उत्पन्न हे १०० कोटींवरुन २०० कोटी होणार आहे. विशेष शुल्काचे दर कमी करताना मद्य आयात दरांचा नफा सुद्धा कमी करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. या सर्वांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या काळाता हा निर्णय घेतला असता आणि आम्ही विरोधी पक्षात असतो तर आम्हीसुद्धा असेच म्हटलो असतो, असे अजित पवार म्हणाले.