दिल्लीतील ओमिक्रॉनबाधितांवर केवळ मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचा वापर


नवी दिल्ली – सध्या पॅरासिटेमॉल आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवणाऱ्या गोळ्यांच्या सहाय्याने दिल्लीमधील लोक नायक जयप्रकाश रुग्णालयामध्ये (एलएनजेपी) उपचार घेत असणाऱ्या ओमिक्रॉनबाधितांवर उपचार केले जात आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवारी या रुग्णावर सुरु असणाऱ्या उपचारासंदर्भात माहिती दिली. आतापर्यंत ४० ओमिक्रॉनबाधित रुग्ण दिल्ली सरकारच्या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १९ बाधितांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

एलएनजेपी रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोणतीच लक्षणे ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांमध्ये दिसून येत नाही. उर्वरित १० टक्के रुग्णांना घशात खवखव, थोडा ताप आणि अंगदुखीचा त्रास यासारखी सौम्य लक्षणे दिसत आहेत. केवळ मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचा वापर ओमिक्रॉनच्या या रुग्णांना उपचारादरम्यान करण्यात आला आहे. इतर कोणत्याही गोळ्या या रुग्णांना देण्याची गरज आम्हाला जाणवली नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेले जवळजवळ सर्वच रुग्ण हे परदेशातून आलेले असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. यापैकी सर्वच रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तीन चतुर्थांश व्यक्तींनी कोरोना लसीचा बुस्टर डोसही घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे एकूण ६७ रुग्ण आढळले असून त्यापैकी २३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.