शरीराने एकत्र असलेल्या सोहना-मोहना जुळ्या भावांना पंजाब सरकारमध्ये मिळाली नोकरी


अमृतसर – पंजाब सरकारने ख्रिसमसची मोठी भेट अमृतसरमध्ये राहण्याऱ्या सोहना-मोहना या दोन जुळ्या भावांना दिली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये दोघांना नोकरी देण्यात आली आहे. आता दोघेही डेंटल कॉलेजजवळील वीज केंद्रात काम करणार आहेत. ११ डिसेंबर २०२१ रोजी सोहना-मोहनाला नियुक्ती पत्र देण्यात आले. आता त्यांना दरमहा २० हजार रुपये पगार मिळणार आहे. सोहना-मोहनाला नोकरी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे, ही संधी दिल्याबद्दल त्यांनी पंजाब सरकारचे खूप आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्ण प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम आम्ही करू, असे सोहनाने सांगितले. तर मोहनाने सांगितले की, पिंगलवाडा संस्थानचे आम्ही खूप आभारी आहोत. त्यांनी आम्हाला पुढे नेले, आम्हाला शिक्षण दिले आणि आम्हाला स्वावलंबी बनण्यास मदत केली. दुसरीकडे, ऑल इंडिया पिंगलवाडा चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा इंद्रजीत कौर म्हणाल्या, सोहना-मोहना सरकारी सेवेत असणे ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आता नोकरी मिळाल्यानंतर दोघेही स्वतःची काळजी घेऊ शकतील.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी जुलैमध्ये इलेक्ट्रिकल डिप्लोमा दोघांनी पूर्ण केला होता. त्यानंतर कंपनीत कनिष्ठ अभियंता पदावर भरतीसाठी अर्ज केला होता. या दोन जुळ्या भावांना दोन ह्रदये, दोन जोड्या किडनी, दोन जोड्या हात आणि पाठीचा कणा आहे. पण एकच यकृत, पित्त मूत्राशय आणि एकूण दोन पाय आहेत.

१४ जून २००३ रोजी नवी दिल्लीत सुचेता कृपलानी हॉस्पिटलमध्ये सोहना-मोहनाचा जन्म झाला. पण त्यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आले. जन्मानंतर आई-वडिलांनी गरिबीमुळे त्यांना सोडून गेले. त्यानंतर डॉक्टरांनी पिंगलवाडा चॅरिटेबल सोसायटीशी संपर्क साधून २००३ मध्ये स्वातंत्र्यदिनी नवजात बालकांना आश्रय दिला. जीवाला धोका असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना वेगळे करण्याचा निर्णय घेतला नाही.