एमपीएससीच्या 2019 मधील उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती, 17 जानेवारीपासून होणार प्रशिक्षणाला सुरुवात


मुंबई – 2019 मध्ये एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणालाही नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 17 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

नियुक्त्या मिळाव्यात म्हणून 2019 राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यसेवा परिक्षा होऊन दोन वर्षांच्या कालावधी लोटल्यानंतर देखील नियुक्ती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. तर आत्मदहनाचा इशारा अनेक विद्यार्थ्यांनी देखील दिला होता. 28 सप्टेंबर 2021 रोजी या 2019 मधील परीक्षेचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा 413 पदांचा समावेश आहे.

विरोधी पक्षांने हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या थंड कारभारावर ताशेरे ओढले होते. राज्यात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना केवळ राजकीय शेरेबाजीवर भर दिला जातो. अनेक विभागांतील भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या विषयाकडे सरकारचे लक्ष विरोधी पक्षाने वेधले होते. राज्यात एवढे गंभीर प्रश्न असताना सरकार काहीही निर्णय घेत नसल्याची टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने एमपीएससीच्या 2019 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसंबंधीचा निर्णय घेतल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.