अत्तर व्यावसायिकाच्या घरी सापडले एवढे घबाड की आठ मशीनही २४ तासात मोजू शकल्या नाहीत पैसे


कानपूर – एका अत्तर व्यावसायिकाच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता अधिकाऱ्यांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. ही छापेमारी कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियूष जैन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल १५० कोटींची रोख रक्कम लागली आहे.

दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून यामध्ये नोटांचे ढीग दिसत आहेत. एका फोटोत कपाट नोटांनी भरल्याचे दिसत आहे. हे पैसे प्लास्टिक पिशवीत ठेवत त्यावर चिकटपट्टी लावून ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अधिकारी खाली बसून पैसे मोजताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर नोटांचा ढीग लागला आहे. एकूण किती रक्कम सापडली हे अद्याप समजू शकलेले नाही. अद्यापही अधिकारी पैशांची मोजणी करत आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, ही धाड गुरुवारी टाकण्यात आली असून अद्यापही ही कारवाई सुरु आहे. कानपूर, उत्तर प्रदेश, मुंबई आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरु आहे. करचोरी केल्याप्रकरणी जीएसटीकडून ही कारवाई करण्यात आली. यानंतर आयकर विभागही कारवाईत सहभागी झाले.

हे सर्व पैसे खोटी बिले बनवून गोळा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बनावट कंपन्यांच्या नावे ही बिले तयार करण्यात आली होती. एक बिल ५० हजारांचे असून अशी २०० हून अधिक बिले जीएसटी पेमेंटविना तयार करण्यात आली होती. चार ट्रकमध्ये ही बिले सापडली असून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून कारवाई करण्यात आलेले पियूष जैन हे ओळखले जातात. अखिलेश यादव यांनीच त्यांच्या अत्तराचे लाँचिंग केले होते. यावरुन भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. हाच समाजवादी पक्षाचा खरा रंग असल्याचे ट्विट उत्तर प्रदेश भाजपने केले आहे. समाजवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका त्यांनी केली आहे.