सरकारने उत्तर प्रदेश निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा; उच्च न्यायालय


अलाहाबाद – देशातील ओमिक्रॉनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. तसेच केंद्र सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठात जामीन अर्जांवर सुनावणी सुरु होती. यादरम्यान न्यायालयातील गर्दी पाहून पंतप्रधान मोदींना, असे आवाहन करण्यात आले आहे.

अद्याप देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. तसेच ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशातच येत्या काळात उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्यादृष्टीने तयारीही सुरु केली आहे. उत्तर प्रदेशचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा स्वतः दौरे करत आहेत. तसेच अनेक विकास कामांना गतीही देण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी, अशी सूचना केली आहे. त्यासोबतच सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने असे देखील म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयुक्तांनी राज्यातील निवडणूक रॅली आणि सभा रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रचार करावा, असे सांगावे. पंतप्रधानांनीही निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करावा.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौतुकही केले आहे. देशभरात सुरु असलेल्या राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेबाबत मोदींचे न्यायालयाने कौतुक केले आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात मोफत लसीकरण अभियान चालवले, हे कौतुकास्पद असल्याचे म्हणत न्यायालयाने मोदींचे कौतुक केले आहे.