राणीबागेतील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावरून सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत शाब्दिक फटकेबाजी!


मुंबई – पर्यटकांसाठी आणि सामान्य मुंबईकरांसाठी राणीबागेतील पेंग्विन हे चर्चेचा विषय ठरले होते, तसेच तो राजकीय नेतेमंडळींमध्ये देखील चर्चेचा विषय झाला होता. हे पेंग्विन आणि त्यांच्यावर होणारा खर्च, त्यांची आवश्यकता, त्यांच्यासाठीचा हट्ट अशा बऱ्याच मुद्द्यांवरून राजकीय टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. पण पेंग्विनचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यंदा राजकीय आरोपांमुळे नसून थेट राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत याचा संदर्भ आला आहे. पेंग्विनच्या मुद्द्यांवरून सरकारवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करताना थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरच खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

सरकार परीक्षांमध्ये गरीब विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी पैसे घेत असून राणीबागेतल्या पेंग्विनवर मात्र कोट्यवधींचा खर्च होत असल्याचा मुद्दा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून टीका करताना एक किस्सा सांगितला. यामध्ये त्यांना भेटलेल्या एका गरीब विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यासंदर्भातील व्हिडीओ मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील शेअर केला आहे.


मला एक गरीब विद्यार्थी असे म्हणाला की नोकरीच मला मिळत नाही. मी १०० रुपये रोजीने आत्ता काम करतो. मी म्हटले चांगले दिवसही येतील ना. तो म्हणाला साहेब मला तर वाटते की खरच मरावे आणि राणीबागेच्या पेंग्विनच्या रुपाने जन्म घ्यावा. पण मी विचारले, असे तुला का वाटते? तो मला हिशोब सांगत होता, की त्या पेंग्विनवर रोज २० हजार रुपये खर्च होतात. एका तासाला ८३३ रुपये म्हणजे महिन्याला ६ लाख रुपये खर्च होतात, असे मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना पेंग्विनवरील खर्चाची तुलना थेट राज्यातील मंत्र्यांच्या पगाराशी केली. वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विनवरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार २ लाख ५२ हजार किंवा ५३ हजार आहे. पण पेंग्विनचा ६ लाख आहे हो. म्हणजे मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल आहेत. १५ कोटी रुपये पेंग्विनवर खर्च होतो. आमची मानसिकता किती भिकारी असावी, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. दरम्यान, मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणाचा शेअर केला असून तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.