नवाब मलिकांचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीतील चर्चेबद्दल मोठा खुलासा


मुंबई – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे सावट महाराष्ट्रासह देशात गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्दुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानसभेच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाच्याआधी सभागृहामध्ये प्रवेश करताना पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोनाबाबत काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. यामध्ये १८ टक्के रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. जानेवारीमध्ये ही तिसरी लाट येऊ शकते, असे नवाब मलिक म्हणाले. तसेच पुढे बोलताना, मुख्यमंत्री महोदयांनी काल रात्री टास्क फोर्सही बैठक घेतली. वाढता कोरोना आणि राज्यात वाढत असलेले ओमिक्रॉनचे रुग्ण याचा विचार करून राज्यात आज निर्बंध लावले जाऊ शकतात, असेही मलिक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे असल्याचेही मलिक म्हणाले. रात्रीची जमावबंदी आज, शुक्रवारपासून लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली आज जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

काल दिवसभरात मुंबईत ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ कोरोनाबाधित आढळले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना टास्क फोर्सशी व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे चर्चा केली. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.

याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री पुन्हा कोरोना टास्क फोर्सशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

दुसरीकडे, कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात आली. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ११७९ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील रुग्णवाढ लक्षणीय आहे. मुंबईत काल दिवसभरात ६०२ रुग्ण आढळले. बुधवारी मुंबईत ४९० रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा दोन महिन्यांतील उच्चांक होता. त्यात गुरुवारी मोठी भर पडली. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असली, तरी राज्याच्या अन्य भागात अजून तरी तेवढी वाढ झालेली नाही. काल दिवसभरात पुणे जिल्हा १८४, नगर ४४, मराठवाडा २७, विदर्भ १८ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या ७,८९८ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

ओमिक्रॉनचे सावट नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर आहे. ओमिक्रॉनबाधित वाढू लागल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि कोरोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.