राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलीनी श्रीहरणला 1 महिन्यांचा पॅरोल मंजूर


चेन्नई – देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरण हिला 1 महिन्यांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, कागदोपत्री प्रक्रिया पार पडताच आज नलिनी तुरुंगातून बाहेर पडणार आहे. 7 जणांना राजीव गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. त्यापैकी, एक नलीनी श्रीहरण आहे. नलीनीला एक महिन्यांची सुट्टी तामिळनाडू सरकारने मंजूर केली आहे. यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयासही माहिती देण्यात आली आहे.

न्या. पी.एन. प्रकाश आणि न्या. हेमलता यांच्या खंडपीठाला राज्य सरकारचे वकील हसन मोहम्मद यांनी नलिनीची आई एस. प्रद्मा यांनी केलेल्या याचिकासंदर्भात माहिती दिली. ही माहिती नोंद करुन घेतल्यानंतर खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी बंद केली आहे. पद्मा यांना अनेक आजार असल्यामुळे मुलगी नलीनी ही महिनाभर तिच्याजवळ राहावी, अशी इच्छा नलिनीची आई पद्मा यांनी याचिकेत व्यक्त केली आहे. याबाबत, 1 महिन्याचा पॅरोल मिळविण्यासाठी राज्य सरकारला सातत्याने अर्ज केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नलीनाचा 1 महिन्यांचा पॅरोल 24 किंवा 25 डिसेंबरपासून सुरू होईल.

आणखी एक याचिका नलीनीने न्यायालयात केली असून ती प्रलंबित आहे. वेल्लोर सेंट्रल जेलमधून तिची सुटका करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कारण, ती गेल्या 30 वर्षांपासून अधिक वेळ याच कारागृहात आहे. एका सत्र न्यायालयाने सन 1998 मध्ये नलीनीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्याच शिक्षेला 2000 साली जन्मठेपेत बदलण्यात आले. दरम्यान, 2018 मध्ये एआयएडीएमके सरकारने 7 दोषींची सुटका करण्यासाठीचा प्रस्ताव सर्वानुमते विधानसभेत पारीत केला होता. हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला. पण, या प्रस्तावावर 2 वर्षात काहीही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर, या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच असल्याचे राज्यपालांकडून सांगण्यात आले.