IIT च्या संशोधकांनी तारखेसह भारतात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनमुळे येणार असल्याचे वर्तवले भाकित


कानपूर – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव जगभरात वाढल्याचे चित्र दिसत आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये दिवसोंदिवस ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ओमिक्रॉनचे ८९ देशांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्येही ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ होत असून नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाकळण्यासाठी निर्बंध लागू करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. त्यातच आता ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट देशात येणार का यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या आहेत. असे असतानाच आता तज्ज्ञांनी भारतामधील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाकित वर्तवले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात कानपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी अभ्यास केला आहे. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनुसार देशात लवकरच ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये बाधितांच्या संख्येचा उच्चांक गाठला जाईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

भारतामधील कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात हा निष्कर्ष कानपूर आयआयटीमधील या संशोधकांनी गॉजियन मिक्सर मॉडल या स्टॅटिस्टीकल टूलच्या माध्यमातून काढला आहे. ऑनलाइन प्रीप्रिंट सर्व्हर मेडिरेक्व्हीने प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये जगभरातील कोरोना संसर्गाच्या ट्रेण्डचा अभ्यास करण्यात आला आहे.

भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरच्या मध्यापासून सुरु होईल, असे या अभ्यासाच्या आधारे दिसत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनाची ही तिसरी लाट फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये सर्वाधिक उंच्चाकावर असेल, असेही अहवालात म्हटले आहे. भारतामधील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानची आकडेवारी आणि सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या आधारे संशोधकांनी माहिती गोळा करुन निष्कर्ष काढला आहे. याच माहितीच्या आधारे तिसरी लाट कधी येईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयआयटीच्या संशोधकांनी यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

डिसेंबरच्या सुरुवातीलाच ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत येईल, असे भाकित कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील हा गणितीय निष्कर्ष बनवण्याच्या कामात सहभागी असलेले आयआयटीचे संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. या लाटेचा सर्वाधिक प्रभाव फेब्रुवारीमध्ये जाणवेल. लाटेचा सर्वाधिक प्रभाव असताना देशात दिवसाला एक ते दीड लाख रुग्ण आढळून येतील, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

पण अग्रवाल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एकमेव दिलासादायक गोष्ट म्हणजे तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असण्याची शक्यता आहे. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे ओमिक्रॉनमुळे प्रकृतीला अधिक त्रास होत असल्याची प्रकरणे अद्याप समोर आलेली नाही.