हरभजन सिंगची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा


नवी दिल्ली – औपचारिकपणे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने केली आहे. मागील २३ वर्षांच्या खेळातील प्रवासाला निरोप देत असल्याचे त्याने ट्वीट करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने यात निवृत्ती घोषित करतानाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हरभजनने या ट्विटमध्ये सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असल्याचे म्हणत त्याच्या आयुष्यातील प्रत्येकाला धन्यवाद दिले.


हरभजन सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, मागील २५ वर्षांचा माझा जालंधरची गल्ली ते भारतीय क्रिकेट संघापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता. जेव्हा जेव्हा मी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून मैदानात उतरलो, तेव्हा तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली. त्यापेक्षा मोठी प्रेरणा माझ्या आयुष्यात दुसरी कोणती नव्हती. पण, आयुष्यात काही कठीण निर्णय घ्यावे लागतात, अशी वेळ येते.

मागील काही वर्षांपासून मला एक घोषणा करायची होती. तो क्षण तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याची मी वाट पाहत होतो. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून मी आज निवृत्ती घेत आहे. खरतर मनातल्या मनात मी निवृत्ती आधीच घेतली होती, पण याची घोषणा करू शकलो नाही. मागील काही काळापासून मी सक्रिय क्रिकेट खेळत नव्हतो. पण, कोलकाता नाईट रायडर्ससोबत काही निर्णय ठरला होता, त्यामुळे आयपीएलमध्ये मी त्यांच्यासोबत होतो. या काळातच मी निवृत्तीचे ठरवले असल्याचेही हरभजनने नमूद केले.