विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणुक


मुंबई – निर्धारीत कालवधीतच मुंबईत सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे संपणार आहे. २२ डिसेंबरला अधिवेशनाची सुरुवात झाली, तर हे अधिवेशन २८ डिसेंबरला संपणार असल्याचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आधीच जाहीर करण्यात आले होते. पण नियमाप्रमाणे अधिवेशन सुरु असतांना आणखी एक कामकाज सल्लागार समितीची बैठक आज सकाळी पार पडली. त्यामध्ये २८ तारखेलाच अधिवेशन संपणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी भाजपने आजच्या बैठकीत केली. राज्यातील विविध विषयांवर चर्चा बाकी असून राज्य सरकारकडून उत्तर – न्याय मिळणे अपेक्षित आहे, असा मुद्दा भाजपने मांडला. पण ही मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली आणि २८ तारखेलाच विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज संपणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदासाठी २८ तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवडणुक घेतली जाणार असल्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यासाठी २७ तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाईल. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ही निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने न होता आवाजी मतदानाने होणार आहे. या बदलेल्या निवडणुक प्रक्रियेबाबत भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान आवश्यक संख्याबळ महाविकास आघाडी सरकारकडे असल्यामुळे ही निवडणुक एक औपचारिकता ठरणार आहे. पण असे असले तरी या निवडणुकीसाठी भाजपे उमेदवार मैदानात उतरवतो का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.