चीनने क्वारंटाइन केले १ कोटी ३० लाख लोकसंख्येचे संपूर्ण शहर


बीजिंग – कोरोनाबाधितांची संख्या चीनमध्ये झपाट्याने वाढत असून चीनने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारी पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाउनची घोषणा केली आहे. दोन वर्षांपूर्वी वुहानमध्ये सर्वात आधी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला त्यावेळी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांनंतरचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

हे निर्बंध आपल्या झीरो टॉलरन्स ध्येयाचा उल्लेख करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. चीनमधील शीआन शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे. एक कोटी ३० लाख लोक या शहरामध्ये राहतात. अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण सरकारकडून त्यासाठीही विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात चीनमधील सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत असून या चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जिल्ह्यांमध्ये १२७ बाधित आढळून आले. कोरोनाचा संसर्ग हा अधिक चिंतेचा आणि गुंतागुंतीचा विषय झाल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे. त्याचदरम्यान नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या असणाऱ्या होणारा प्रवास आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर चीनसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या शीतकालीन खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत.

सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन पूर्ण तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे. येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे आदेश चीनचे उप पंतप्रधान सुन चुनलान यांनी दिले आहेत. चीननमधील प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या चुनलान यांनी देशातील मुख्य शहरांमध्ये मोठ्या सभा आणि गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी तसेच प्रवासावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णयांवर जोर दिला आहे.

शीआनमधील लॉकडाउन हा तेथे स्थानिक पातळीवर होत असणाऱ्या डेल्टा संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखून शून्य कोरोनाबाधित आढळून येतील, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चीन अगदी लसीकरण, निर्बंध आणि इतरही सर्व मार्गांनी प्रयत्न करत आहे.

शीआन शहरामधून देशभरामध्ये कोरोनाचा पार्दुभाव होण्याची शक्यता असल्यामुळे गुरुवारपासून या शहरामध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या देशांतर्गत विमान सेवांवरही बंदी घालण्यात आल्याचे वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. असे निर्बंध एका महिन्यासाठी लागू करण्यात आल्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची अनेक उदाहरणे चीनमध्ये आहेत. त्यामुळेच आता शीआनमधील संसर्ग रोखण्यासाठीही हाच मार्ग निवडण्यात आला आहे.