ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यूची घोषणा


लखनौ – देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून पूर्वकाळजी घेण्याचे तसेच गरज पडल्यास निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. आतापर्यंत देशात ओमिक्रॉनचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस्मसपासून उत्तर प्रदेशात याची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशात २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.

याशिवाय लग्नामधील उपस्थितीवरही योगी आदित्यनाथ सरकारने बंधने आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये कोरोनासंबंधी नियमांचे कठोर पालन करावे लागेल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सांगितले आहे. नाईट कर्फ्यू लागल्यानंतर लोकांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर फिरण्याची मुभा नसेल.

ओमिक्रॉनचे सावट नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि कोरोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.

दरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत मध्य प्रदेश सरकारने देखील संचारबंदी लागू केली आहे. ओमिक्रॉनबरोबरच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले.