शिक्षणाधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आपचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक


नाशिक – आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र भावे यांच्यावर अटकेची कारवाई महिला शिक्षण अधिकाऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी करण्यात आली आहे. नाशिकमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एका फेसबुक लाईव्ह दरम्यान, आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागावर ताशेरे ओढले होते. तसेच लाईव्ह दरम्यान सुनीता धनगर यांच्यां संदर्भात एकेरी उल्लेख करत त्या भ्रष्टाचारी असल्याचाही उल्लेख केला होता. मनपा शिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना खडे बोलही सुनावले होते. त्यावेळी बोलताना काम जमत नसले, तर घरी बसून धुणी भांडी करावीत, असे आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र भावे यांनी केले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

पेपरफुटी प्रकरण सध्या राज्यात चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच म्हाडा, टीईटी, आरोग्य भरती परीक्षा, एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. जितेंद्र भावे यांनी या सर्व प्रकरणी एक फेसबुक लाईव्ह केले होते. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर प्रहार केले होते. याप्रकरणी जितेंद्र भावेंसह त्यांच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना कामानिमित्त भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्या वेळ देत नसल्याचा आरोपही भावेंनी केला होता.