राज्यातील १०७६ शेतकऱ्यांच्या मागील पाच महिन्यात आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती


मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एकूण १०७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. या आत्महत्यांपैकी ४९१ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांना आर्थिक मदतही दिल्याचेही ते म्हणाले आहेत.

कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना दिल्यानंतरही नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यासबंधी तसेच आर्थिक सहाय्य आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. १०७६ शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोबर २०२१ कालावधीत आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने ४९१ पात्र ठरवली असून, २१३ अपात्र ठरली आहेत. तर ३७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र ४९१ पैकी ४८२ जणांना मदतीचे वाटप करण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

नापिकी, राष्ट्रीयकृत बँक किंवा मान्यताप्राप्त सरकारकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाखाची मदत दिली जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.