विधानसभेत ठाकरे सरकारची राज्यातील २५ हजार महिला गायब असल्याची धक्कादायक माहिती; चित्रा वाघ यांचा संताप


मुंबई – बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून यावेळी सरकारकडून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. सरकारने विधानसभेत राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती दिली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारची हे सांगताना जीभ का जड झाली नाही, अशी विचारणा करताना नेमके राज्यात चालले आहे काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे.


राज्यात २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली आहे. पण हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही. २५ हजार महिला गायब कशा काय होऊ शकतात? त्यांची तस्करी झालीय का..राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का? माता भगिनींचे रक्षण करू न शकणारं सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?, असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.


ट्विटरवर एक व्हिडीओही चित्रा वाघ यांनी शेअर केला आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, खुद्द गृहमंत्र्यांनी काल विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याचे कबूल केले आहे. हे बोलताना जीभ जड कशी झाली नाही. नेमके राज्यात चाललयं काय? कधी पोलीस आयुक्त गायब होतात? कधी गृहमंत्री गायब होतात? कधी मुख्यमंत्री गायब होतात? आणि आता तर राज्यातील ६० हजार महिला गायब झाल्या ज्यामधील काही मिळाल्या. मात्र २५ हजार अद्यापही गायब आहेत.

सरकारच्या नाकाखाली हे सुरु असून पोलीस यंत्रणा नेमके काय करत आहे? पोलीस यंत्रणा काय फक्त राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या दावणीला बांधली गेली आहे आणि त्यामुळे या गरीब महिलांना शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. देशात सर्वाधिक महिला गायब होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागत असून हे भूषणावह नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, गृहमंत्र्यांना माझा थेट प्रश्न आहे. त्या महिलांचे नेमके काय झाले? त्यांची तस्करी झाली आहे का? राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रिय आहे का? पोलीस त्यांना शोधून का काढत नाही आहेत? त्यांना शोधण्याची जबाबादारी सरकारची आहे. अन्यथा सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?.