प्रवीण तरडेंचे रविना टंडनकडून कौतुक!


‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर प्रचंड व्हायरल झाला होता. बाहुबली फेम प्रभासने त्यावर एक ट्वीट केले होते. तर आता बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनही यावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे रविनाने ही पोस्ट मराठीत केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट रविनाने शेअर केली आहे. सरसेनापती हंबीररावचा टीझर रविनाने ट्वीट करत शेअर केला. हा टीझर शेअर करत प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा, असे कॅप्शन रविनाने दिले आहे. रविनाने मराठीत ट्वीट करत मराठी चित्रपटसृष्टीला दिलेला पाठिंबा पाहत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.


या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशा चारही जबाबदाऱ्या प्रवीण तरडे यांनी पार पाडल्या आहेत. मराठीत कधी दिसले नाही, असे काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार, असे तरडे या चित्रपटाविषयी म्हणाले होते. तर खरच या चित्रपटाच्या भव्यतेची झलक या टीझरमध्ये पहायला मिळते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची प्रविण तरडे यांनी घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याआधी प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते.