फायझरने आणली १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक गोळी


वॉशिंग्टन – कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट दिवसेंदिवस येत असल्यामुळे आरोग्य सेवेशी संबंधित लोकांची चिंता वाढली आहे. तर, भीतीच्या सावटाखाली सर्वसामान्य माणूसही जगत आहे. माणूस सध्या तरी केवळ लसीकरणामुळे कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो. याशिवाय औषध निर्मिती आणि लसींची निर्मिती जगभरात सुरू आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी या सर्व परिस्थितीमध्ये मोठा निर्णय घेतला. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी १२ वर्षे वयोगटातील आणि त्याहून अधिक वयाच्या जोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एफडीएने फायझरच्या गोळीला मान्यता दिली आहे.

फायझरच्या या औषधाला Paxlovid असे नाव देण्यात आले आहे. २२०० लोकांवर या औषधाची चाचणी करण्यात आली. जोखीम असलेल्या लोकांमध्ये या औषधामुळे हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका ८८ टक्क्यांनी कमी केल्याचे दिसून आले. यापूर्वी युरोपियन युनियनमध्ये फायझरच्या या उपचारांना मान्यता दिली गेली आहे. या औषधाच्या १ कोटी डोससाठी अमेरिकेने आधीच पैसे दिले आहेत. लक्षणे दिसू लागल्यानंतर लगेचच या गोळ्या पाच दिवसांसाठी दर १२ तासांनी घ्यायच्या असतात.

दरम्यान, अमेरिकेतही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. कोरोनावरील उपचारासाठी औषधे तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे मर्कने विकसित केलेली आणखी एक कोरोना गोळी लोकांच्या उपचारासाठी वापरण्यात येत आहे. ती गोळी देखील रुग्णाला पाच दिवसांसाठी दिली जाते.