नितेश राणे ‘त्या’ ट्विटसंदर्भात शिवसेनेची एक अटीवर माफी मागण्यास तयार


मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार यांच्यानंतर शिवसैनिक आता नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सध्या नितेश राणे यांच्यासमोर दोन अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे नितेश राणेंनी राणीबागेसंबंधी केलेल्या ट्विटनंतर शिवसैनिकांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. नितेश राणेंवर मुख्यमंत्र्यांबाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे हत्येचा प्रयत्न झाल्याच्या एका प्रकरणात चौकशी करत असताना आरोपीने नितेश राणे यांचे नाव घेतल्यामुळे कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर नितेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेने राणीबागेसंबंधी ट्विट प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, भावना कोणी कोणाच्या दुखावल्या याबदद्दल विचार केला पाहिजे. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावे. अशी निवेदने त्यांनी देत राहावे. आम्ही पाहत राहावे असे काही आहे का? समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी.

शिवसेना रोजच माझ्या ट्विटबद्दल आक्रमक होत असते. रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना दुसरे काय काम आहे. यापेक्षा एसटी कामगार, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी आक्रमक झाले असते, तर महाराष्ट्राचे भले झाले असते, असा टोला यावेळी त्यांनी लगावला. जी माहिती मला मिळाली त्यानुसार मी ट्विट केले होते. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आधी त्यांनी हिंदूंची माफी मागावी, मग मी माफी मागण्यास तयार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.