नवाब मलिकांचे भाजपेला सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे जाहीर आव्हान


मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार असल्यामुळे भाजपने हिंमत असेल तर सरकारविरोधात अविश्वास ठराव आणावा, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. यानंतर त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे, हे समजेल असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान पारदर्शक पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असेल, तर भाजपने त्याचा स्वीकार करावा, असेही नवाब मलिक म्हणाले. आमच्या सरकारकडे विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आहे. विवेकबुद्धीने मतदान झाले पाहिजे, असे भाजपच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते, मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का?, असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबतचा नियम समितीचा अहवाल विधानसभेत बुधवारी सादर करण्यात आला. विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची भूमिका सरकारने जाहीर केली आहे. गुप्त मतदानाने अध्यक्ष निवडीची पद्धत आता बदलण्यात येणार आहे.

याबाबतच्या नियमात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालील नियम समितीने बदल करून अध्यक्षांची निवड आता आवाजी मताने किंवा हात वर करून होईल अशी सुधारणा केली आहे. पण या प्रस्तावास भाजपने विरोध करताना सरकार अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घेण्यास का घाबरते, असा सवाल करीत या सुधारणेस विरोध केला.