जाणून घ्या देशात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लागणार? व्हायरल मेसेज मागील सत्य


कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे देशात, राज्यात लॉकडाउन लागणार का? कोणते निर्बंध लागणार? अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशातच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात असे म्हटलं आहे की भारतात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लागणार आहे. पण त्यामागील सत्य काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजबद्दल माहिती दिली आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारा हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे पीआयबीने सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये पीआयबीने म्हटले आहे, सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात भारताने ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. पण लॉकडाऊनसंदर्भात केंद्र सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

जर तुम्हाला असा फोटो किंवा मेसेज आला असेल, तर तो फॉरवर्ड करु नका. सोशल मीडियावरच्या कोणत्याही चुकीच्या, अफवा पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणी तुम्हाला पाठवला असेल, तर त्या व्यक्तीलाही याबद्दल माहिती द्या. सोशल मीडियावरच्या माहितीवर अंधपणे विश्वास ठेवू नका.