स्वतःचा पक्ष स्थापन करुन धनंजय मुंडेंविरोधात परळीतून निवडणूक लढवणार करुणा शर्मा?


मुंबई – सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा शर्मा यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलेल्या असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आपल्या नवीन पक्षाची घोषणा करुणा शर्मा यांनी केली असून लवकरच अहमदनगरमध्ये सभा घेऊन त्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या पक्षाचे नाव शिवशक्ती सेना असेल असे करुणा शर्मां यांनी म्हटले आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस अहमदनगरमध्ये मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा आणि निवडणूक लढवण्या संदर्भातील इतर माहिती जाहीर करणार, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, मला मध्यंतरी अनेक राजकीय पक्षांनी प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते, पण कोणत्याही पक्षात न जाता आपण स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याप्रमाणेच राज्यात अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यापैकी अनेक महिला माझ्या संपर्कात असल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. दरम्यान पक्षस्थापनेनंतर आपण निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच बीडमधील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवण्याचा मानस करुणा शर्मा यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.