‘बाप’ काढला असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना जितेंद्र आव्हाडांचे आव्हान


मुंबई – बुधवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. दरम्यान विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन निशाणा साधत त्यांनी दुसऱ्या मंत्र्याकडे पदभार द्यावा अशी मागणी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे पदभार द्यावा असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पण त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर विश्वास नसावा, असा टोलाही लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र विरोधकांच्या या टीकेवर नाराजी व्यक्त करत सुनावले होते. दरम्यान यावरुन चंद्रकांत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.

विधानसभेच्या सदनाबाहेर बुधवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन सुरु असणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, विरोधी पक्षाने मागण्या करणे, आंदोलन करणे, टीका करणे हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणे, हे राजकीय प्रगल्भता नसल्याचे उदाहरण आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते, असे सांगितले.

आव्हाड पुढे बोलताना, मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाही. ते संपूर्ण मंत्रिमंडळाचे नेते आहेत. जेव्हा त्यांची गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येतील. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणे किंवा चर्चा करणे चुकीचे असल्याचेही आव्हाड म्हणाले.

आपला बाप आजारी असताना, आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणे हेच मला मुळात विकृतपणाचे, बालिशपणाचे लक्षण वाटत असल्याचे म्हणत आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दुसऱ्यांचा बाप काढण्याची जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीच आहे. माझ्या बापाने निवडणूक लढवली नाही. निवडणूक लढवणारा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बांधिल असतो. माझा बाप एका मिलमध्ये कामगार होता. अपघात झाल्यानंतर ११ महिने ते बेडवर होते. बरे झाल्यानंतर पुन्हा ते मिलमध्ये गेले आणि त्यावेळी ते स्वतःची नोंद कामगार म्हणून करत होते. उद्धव ठाकरेंना जर ते बाप मानत असतील आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्या बापाने या फंद्यात पडायला नको होते. निवडणूक लढवून आपण मुख्यमंत्री झालात, तर १२ कोटी लोकांना आपण उत्तर देण्यासाठी बांधिल आहात. त्यामुळे त्यांनी मला उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबद्दल समजून सांगण्याची गरज नसल्याचे चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

मी जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे. जर यातील एकही वाक्य मी बोललो असेन, तर दोघांचे बाईट दाखवा. मी एक टक्का जरी चंद्रकांत पाटलांचे नाव घेतले असेल तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन. खोटे नाही बोलायचे, महाराष्ट्राला वेडे नाही बनवायचे, असे जितेंद्र आव्हाड एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.