१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आयपीएलचा मेगा लिलाव!


नवी दिल्ली- आयपीएल आगामी हंगामाच्या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या असून यासंदर्भात Cricbuzzने दिलेल्या वृत्तानुसार, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएल २०२२चा मेगा लिलाव होणार आहे. सर्व फ्रेंचायझींना आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १० संघ लिलावात यावेळी सहभागी होतील, कारण लखनऊ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ आयपीएलमध्ये सामील झाले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी आयपीएल लिलावादरम्यान बोली लावली जाऊ शकते.

दरम्यान, १ डिसेंबरपासून लखनऊ आणि अहमदाबादसाठी रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.

Cricbuzzने दिलेल्या वृत्तानुसार, २ एप्रिलपासून आयपीएल २०२२चा हंगाम सुरू होऊ शकतो. तर पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या वेळी सामने वाढल्यामुळे ही लीग ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चालू शकते. ४ किंवा ५ जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे १४-१४सामने खेळावे लागणार आहेत. ७ सामने घरच्या मैदानावर तर ७ सामने घराबाहेर खेळवले जातील.

आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.