अजित पवारांवर केलेल्या टीकेवरुन गोपीचंद पडळकरांना धनंजय मुंडेंचा टोला


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनुपस्थितीने विरोधकांच्या हातात आयते कोलितच मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांवर अनेकांनी टीका करत मुख्यमंत्रिपदाचा भार इतर कोणाकडे तरी सोपवण्याचा सल्ला दिला आहे. आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे अशी नावे चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड अशा भाजप नेत्यांनी सुचवली आहेत. चंद्रकांत पाटलांनी तर रश्मी ठाकरेंचे नावही सुचवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

जर अजित पवारांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्रिपद दिले, तर ते चारच दिवसांत राज्य विकून मोकळे होतील, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादांवरील गोपीचंद पडळकर यांचे आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला आहे. मुंडे यांनी ही प्रतिक्रिया अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना दिली आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध विषयांवरून जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. पेपरफुटी घोटाळा, शेतकरी मदत, एसटी कर्मचारी आंदोलन अशा मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवारांकडे कारभार देण्याचा सल्ला दिला आहे. पण, मुख्यमंत्रिपद अजित पवारांकडे दिले, तर ते चारच दिवसांत राज्य विकून खातील, अशी जळजळीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.