यामुळे चीनने चोरली भारतातील गाढवे


नवी दिल्ली : भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे. भारतातील गाढवे चीनने चोरली असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला ब्रुक इंडियाने दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील गाढवांची संख्या गेल्या ९ वर्षांत ६१.२३ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती त्यात आहे. देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून गाढवांचा उपयोग होतो.

गाढवांची कातडी चीनमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतून तस्करीद्वारे पोहोचवली जात आहेत. आधी चीनमध्ये वाघांच्या अवयवांची तस्करी होत होती. गाढवाच्या कातडीचा वापर चीनमध्ये तयार होणाऱ्या इजियाओ या पारंपरिक औषधासाठी केला जातो. त्यासाठी गाढवांची तस्करी केली जात आहे. चीनच्या या आगळीकीमुळे भारतात २०१२ साली असलेली ३ लाख २० हजार एवढी गाढवांची संख्या घटून ती २०१९ साली पशुधन गणनेत १ लाख २० हजार एवढी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तान आणि चीनमध्ये गाढवांच्या खरेदीसाठी करार झाला आहे. दरवर्षी पाकिस्तानकडून सुमारे 80 हजार गाढवांची निर्यात करण्यात येते. गाढवांच्या व्यापारामध्ये आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनात अनेक चिनी कंपन्यांनी लाखो डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानमध्ये एका गाढवाच्या चामड्याची किंमत ही १५ ते २० हजारांच्या घरात असते. गाढवांच्या निर्यातीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. पाकिस्तानमध्ये गाढवांसाठी खास विशेष रुग्णालयेही आहेत. पाकिस्तान हा गाढवांची सर्वाधिक संख्या असणारा देश आहे. प्रजातीनुसार गाढवांच्या किंमती ठरवल्या जातात.