ओमिक्रॉन आणि बूस्टर डोस यावरचा एक भन्नाट व्हायरल व्हिडीओ अदर पूनावाला यांनी केला शेअर


पुणे – जगभरातील प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची धास्ती घेतली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लसी या व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील की नाही? हा व्हेरिएंट नेमका किती घातक आहे? याविषयी अजूनही जगभरातील संशोधक अभ्यास करत आहेत. अशातच कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. डेल्टा, ओमिक्रॉनवर व्हायरल होत असलेले हा व्हिडीओ म्हणजे एक मीम असून ती होम अलोन या टीव्ही शोमधील एका सीनची व्हिडीओ क्लिप आहे. पण, त्यात डेल्टा, ओमिक्रॉन आणि व्हॅक्सिनचा समावेश करून त्यातून मीम तयार करण्यात आले आहे.


होम अलोन या टीव्ही शो सीरीजमधील एक सीन अदर पूनावाला यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आहे. हे मीम मूळत: जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने कोरोना आणि लसीकरण याविषयी जनजागृती करण्यासाठी शेअर केले होते. तीच क्लिप अदर पूनावाला यांनी पुन्हा एकदा शेअर केली आहे.

होम अलोन सीरीजमधील हॅरी आणि मार्व हे दोन चोर या क्लिपमध्ये दिसत आहेत. चोरीच्या उद्देशाने ते एका घरात शिरतात. पण तेथील एका मुलाच्या हुशारीमुळे त्यांचा प्लॅन फसतो, असे या व्हिडीओमध्ये आहे. पण मीम बनवताना या पात्रांना कोरोनाशी संबंधित गोष्टींची नावे देण्यात आली आहेत.


व्हिडीओमध्ये आधी ओमिक्रॉन नाव दिलेला हॅरी घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना वरच्या मजल्यावरून होम अलोनमधील लहान मुलाचे पात्र असलेला केविन मॅककॅलिस्टर वरून एक दोरीला बांधलेली कुंडी खाली सोडतो. त्यावर व्हॅक्सिन असे लिहिलेले आहे. ओमिक्रॉन खाली वाकतो आणि व्हॅक्सिनमुळे डेल्टाचा कपाळमोक्ष होतो. ओमिक्रॉन खूश होत असतानाच मॅककॅलिस्टर पुढची कुंडी सोडतो ज्यावर बूस्टर डोस असे लिहिलेले आहे. ती कुंडी ओमिक्रॉनवर आदळते आणि तोही खाली पडतो.

जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यामध्ये लस घेतल्यानंतर आणि त्यावर बूस्टर डोस घेतल्यानंतरच कोरोनामधून येणाऱ्या आजारांचा तुम्ही सामना करू शकता, असा संदेश देखील लिहिला आहे. अदर पूनावाला यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच येथे नेमके काय घडत आहे ? असा एक उपहासात्मक संदेश देखील अदर पूनावाला यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओ मीमवर नेटिझन्सकडून तुफान प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.