अजित पवारांनी सभागृहात मास्क न वापरणाऱ्या आमदारांना झापले


मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजादरम्यान मास्क न वापरणाऱ्या आमदारांना खडे बोल सुनावले आहेत. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मास्कचे महत्व पटवून देताना अजित पवार यांनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन कोरोना परिस्थितीसंदर्भात किती गांभीर्याने विचार करत आहे याचा दाखल देत विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेखही केला.

दरम्यान कर्नाटकमधून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकावणाऱ्याला अटक करण्यात आल्याच्या मुद्द्यावरील चर्चा झाल्यानंतर अजित पवार त्यांच्या आसनावरुन उठले आणि पिठासीन अध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्या परवानगीने बोलू लागले. मला आपल्यामार्फत सभागृहाचे लक्ष एका विषयाकडे वेधायचे आहे. अधिवेशन कालपासून सुरु झाले, आज दुसरा दिवस आहे. आपण तीन, चार, पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननिय सदस्य करत आहे. देशाचे पंतप्रधान देखील स्वत: जो काय सध्या कोरोनासंदर्भातील संकट आहे, त्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामध्ये रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देश पातळीवर सुरु आहे. काही ठराविक सोडले तर अजिबात येथे कोणी मास्क लावत नसल्याचे मत अजित पवारांनी मास्क न लावणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

येथे काय सुरु आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. लोकप्रतिनिधी असून कुणी मास्क लावत नसू तर कसे होणार? ठिक आहे, काही जणांना मास्क काढल्याशिवाय त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडता येत नसतील. पण बोलून झाल्यावर तरी मास्क घातला पाहिजे ना?, असेही अजित पवार म्हणाले.

परदेशातील परिस्थितीचा संदर्भाही यावेळी अजित पवार यांनी दिला. एवढी वाईट परिस्थिती आहे ज्याचा अंदाज नाही अध्यक्ष मोहोदय आपल्याला. परदेशात दिड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या होत चालली आहे. परदेशामध्ये पाच लाख लोक मृत्यूमुखी पडतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हे झाले परदेशाचे आपल्या भारताचे आणि महाराष्ट्राचे काय?, असा प्रश्न मास्क न घालणाऱ्या विधानसभा सदस्यांना अजित पवारांनी विचारला.

मास्क घातला नसेल, तर अगदी मलाही बाहेर काढा असेही अजित पवार म्हणाले, अध्यक्ष महोदय काही काही गोष्टींचे गांभीर्य त्या त्यावेळीच लक्षात घेतले पाहिजे. आपण देखील तिथे बसताना कोणीही मास्क घातले नसेल, तर त्याला बाहेर काढा. अगदी माझ्यासारख्याने मास्क घातला नसेल, तर मलाही बाहेर काढा. कुठेतरी हे गांभीर्याने घ्या. माझी विरोधी पक्षनेते आणि सर्वांनाच विनंती आहे की आपण हे गांभीर्याने घेतले पाहिजे, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपल्या कृतीचे बाहेर लगेच व्हिडीओ क्लिप बनून, ऑडिओ काढते. कृपा करुन ही गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर कितीही कोणीही प्रयत्न केला, तरी रोखता येणार नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.