अमेरिकेत कोरोना मदतनिधीमध्ये साडेसात लाख कोटींचा घोटाळा


वॉशिंग्टन – कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका अमेरिकेमध्ये वाढत असतानाच आता कोरोनासंदर्भातील मोठा घोटाळा समोर आला आहे. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसने सादर केलेल्या अहवालामध्ये कोरोना मदतनिधीमध्ये १०० अब्ज डॉलर्सचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कोरोना मदतनिधीमधील १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेसात लाख कोटी रुपये चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेतील कामगार विभागाने बेरोजगारीसंदर्भातील भत्त्यामध्ये मोठी रक्कम लाटण्यात आल्याचा दावा केला आहे. सरकारकडून बेरोजगारांना देण्यात येणाऱ्या रक्कमेबरोबर कर्जाच्या नावाखाली फसवणूक करुन मिळवलेल्या रक्कमेमधून १.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सची रक्कम विभागाने परत मिळवली आहे. तर फसणवूक करुन मिळवलेले २.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सही विभागाने यशस्वीपणे परत मिळवले आहेत. कोरोना कालावधीमध्ये बेरोजगार असल्याचे सांगून सरकारी मदत घेणारी ९०० हून अधिक प्रकरण तपासामध्ये समोर आली आहेत. यापैकी काहीजणांकडून पैशांची वसूली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत १५० जणांविरोधात कारवाई करुन ७५ मिलियन अमेरिकन डॉलर्सची वसूली अमेरिकेतील न्याय विभागाने केली आहे. कोरोना कालावधीमध्ये सरकारकडून मदत म्हणून गरजूंना देण्यात येणारे पैसे या योजनेअंतर्गत पात्र नसलेल्यांनी फसवणूक करुन मिळवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आम्ही कोरोना कालावधीमध्ये फसणूक करुन सरकारी मदत मिळवणाऱ्या ३० जणांविरोधात कारवाई केल्याचे जेसिका आर्बर यांनी सांगितले आहे. जेसिका या व्हर्जेनिया राज्याच्या अटॉर्नी म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकन सरकारने सुरु केलेल्या पे चेक प्रोटेक्शन प्रोग्राम (पीपीपी), इकनॉमिक इंज्युरी डिझास्टर लोन (ईआयडीएल) आणि अनएम्प्लॉमेंट इन्शुअर्न्स (युआय) या तीन योजनांअंतर्गत घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे.

सरकारकडून अनेक छोट्या उद्योजकांनी पीपीपी योजनेअंतर्गत खोटी कागदपत्रे दाखवून कर्जाची रक्कम घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर युआय योजनेमध्ये लोकांची ओळखपत्रे चोरणाऱ्यांनी पैसे मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.