कट्टर इस्लामी सौदी अरेबियाने महिलांसाठी उघडले लष्करी सेवेचे दरवाजे

कट्टर इस्लामी अशी प्रतिमा असलेल्या सौदी अरेबियाने फेब्रुवारी २०२१ पासून महिला सशक्तीकरणासाठी अनेक पावले टाकली असून आत्ता लष्करी सेवेसाठी महिलांना दरवाजे खुले केले आहेत. सेनेच्या पायदळ, नौसेना आणि हवाई दलाबरोबरच सौदी महिला नौसेना वैद्यकीय सेवा व रॉयल स्ट्रॅटीजीक मिसाईल फोर्स मध्येही काम करू शकणार आहेत. महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत येथील महिलांना प्रथमच वाहन चालक परवाने दिले गेले होते. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी महिला सशक्तीकरणाचा वेग अधिक तेज केला होता.

यात वाहन परवाना, सार्वजनिक ठिकाणी अबाया न घालण्याची सवलत दिली गेली होती. सेना भरतीसाठीचे नियम जाहीर केले गेले असून त्यानुसार २१ ते ४० वयोगटातील महिला त्यासाठी अर्ज करू शकतील. उंची किमान १५५ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तसेच त्या सरकारी कर्मचारी असता कामा नये. गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या महिला अर्ज करू शकणार नाहीत. प्रवेश चाचणीत पास झाल्यावर त्यांना वैद्यकीय फिटनेस चाचणी पास करावी लागणार आहे.

२०१९ मध्ये प्रथम महिला सेना प्रवेश विचार केला गेला होता. २०१८ च्या आकडेवारीनुसार देशात महिला बेरोजगारीचे प्रमाण २० टक्के होते. गृहमंत्रालय अधिकारातील पोलीस, गुन्हेगार तपास यंत्रणा, गस्त, तीर्थकरू सुरक्षा या यासाठी सुद्धा महिला दले नेमली जात असून यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रथमच ६०० महिला दोन मुख्य मशिदीत कार्यरत झाल्या आहेत.