महिला कमांडो सांभाळणार अमित शहा, सोनिया गांधी यांची सुरक्षा
केंद्रीय राखीव पोलीस दलाने त्यांचे पहिले वहिले महिला गार्ड सुरक्षा दल तयार केले असून ३२ महिला कमांडो असलेल्या या पहिल्या तुकडीतील महिला कमांडोची नियुक्ती झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षा दलात करण्यात येत आहे असे समजते. या महिला कमांडो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीतील अन्य काही अतिमहत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविणार आहेत. या सर्व महिला कमांडोनी त्याचे आवश्यक असे १० आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि नवीन वर्षात त्यांना दिल्लीतील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात केले जाणार आहे.
सुरवातीला या महिला कमांडोना दिल्लीतील झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षा दलात सामील केले जाणार असून पाळीपाळीने त्याच्या ड्युटी बदलल्या जाणार आहेत. यात अमित शहा, सोनिया गांधी यांच्या बरोबरच राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांच्या पत्नी गुरुशरण या शिवाय अन्य अनेक नेत्यांचा समावेश आहे. या महिला हे नेते प्रवासासाठी अन्य भागात गेले तरी त्यांच्या सोबत राहणार आहेतच पण गरज पडल्यास ज्या पाच राज्यात आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत तेथेही तैनात केल्या जाऊ शकतील असे सांगितले जात आहे. व्हीआयपी गृहसुरक्षा टीमचा एक हिस्सा म्हणून या महिला कमांडो काम पाहणार आहेत. त्यांना आवश्यक ती शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे आणि पुरुष कमांडो प्रमाणेच त्या शस्त्रसज्ज असणार आहेत.