उद्धव ठाकरेंनी आपला पदभार कोणाकडे तरी दिला पाहिजे, चंद्रकात पाटलांचा सल्ला


मुंबई – आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उपस्थित राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आजारी असल्यामुळे मुख्यमंत्री गैरहजर असणे साहजिक आहे. पण पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असणे स्वाभाविक आहे, कारण पदभार घेतला, तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरेंकडे ते पदभार का देत नसावेत, असे विचारलं असता त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

अजित पवारांनी पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत ते दिसले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाला असून तो मंत्रालयापर्यंत येत आहे. एका मंत्र्याचे नाव अस्पष्टपणे यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी महाराष्ट्र पोलीस कसा तपास करू शकणार ? त्यामुळे सीबीआयची मागणी केली आहे. लोकशाहीत आम्हाला काही मागण्याचा तरी अधिकार आहे की नाही? की आमचे तोंड दाबून ठेवणार आहात.

जेव्हा स्वप्न पडते तेव्हा ते व्यवहारात येऊ शकत नसते. राष्ट्रपती राजवट येणे काही स्वप्न असून शकत नाही. राजवट येण्यासाठीची सर्व कारणे पूर्ण झाली आहेत. ती आणायची की नाही हा केंद्राचा विषय असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.