ईडी चौकशीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जाणाऱ्या रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – मंगळवारी शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे रवींद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. ही चौकशी तब्बल आठ तास करण्यात आली. ही चौकशी नेमकी कशासाठी करण्यात आली याबाबतचा कोणताही खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. पण अधिवेशनाच्या आदल्या दिवशी झालेल्या या चौकशीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान रवींद्र वायकर यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

आरोप वगैरे काही नाहीत. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांना चौकशीचा अधिकार असून त्यानुसार त्यांनी मला बोलावले होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरे दिली. बोलावल्यानंतर जाणे आणि स्पष्टीकरण देणे हे या देशाचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य असल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले. दरम्यान कोणत्या प्रकरणी चौकशी केली, असे विचारण्यात आले असता त्यांनी माहिती उघड केली जाऊ शकत नसल्याचे सांगितले आहे.

एकच अधिकारी चौकशीसाठी उपस्थित होता, अशी माहिती रवींद्र वायकर यांनी यावेळी दिली. दरम्यान उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्यामुळे चौकशी झाली का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, उद्धव साहेबांच्या जवळचा आहे म्हणून मला बोलवले असे वाटत नाही. त्यांना काही शंका होत्या. त्यांचे निरसन केले. त्यांनी बोलावले म्हणूनच मी गेलो होतो.

रवींद्र वायकर चौकशीला जातील आणि आपली भूमिका माडंतील. जर भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्रे हलत असतील तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आमची सहानुभूती असणाऱ्यांना असा त्रास होणार हे आम्ही गृहितच धरले असल्याचा टोला संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

जसे जया बच्चन यांच्या सूनबाई आणि मुलाच्या बाबतीत काल आम्ही ऐकले. सरकारविरोधात जे जे बोलतील, सरकारला प्रश्न विचारतील त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांच्यासमोर उभे करुन अपमानित केले जाईल. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जाईल, हे सूत्र झाले आहे. हे २०२४ पर्यंत चालेल. त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरु झाली आहे. मोठ्यामोठ्या बिल्डर्स, महापालिका कंत्राटदारांकडून, जो किकबॅक मिळाला आहे मग तो शेअर कंपन्यांद्वारे, एफएसआय, टीडीआर किंवा शाहीद बलवा, अविनाश भोसले यांच्या कंपन्याकडून मिळालेले प्लॉट, जागा या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.