कोरोना वॉर रुम्स पुन्हा सुरु करा, निर्बंध लावा, गरज पडल्यास पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लावा; केंद्राचा राज्यांना आदेश


नवी दिल्ली – देशातील आरोग्य यंत्रणांना ओमिक्रॉनने पुन्हा एकदा खडबडून जागे केले असून या पार्श्वभूमीवर पूर्ण काळजी घेतली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेतलेल्या केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना केल्या असून गरज पडल्यास नाईट कर्फ्यू लावा असा आदेशच दिला आहे. ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत तीन पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रुमची गरज असल्याचेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे. राज्यांना काही सूचना केंद्राने केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी, नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे.

देशातील सर्वच राज्यांना आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवले असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी, असे सांगितले आहे. तसेच गरज पडल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी, असेही म्हटले आहे. गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल, तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांना योग्य वाटत असल्यास त्याआधीदेखील निर्णय घेऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. ओमिक्रॉनसोबतच देशातील अनेक भागांमध्ये अद्यापही डेल्टा उपस्थित असल्याचे यावेळी केंद्राने अधोरेखित केले आहे. यावेळी पत्रात केंद्राने दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, महत्वाचे निर्णय घेणे आणि कठोर तसेच त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई यासंबंधी उल्लेख केला आहे. राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांना तसेच जिल्हा स्तरावर अत्यंत तत्परतेने आणि लक्ष देऊन उपाय आणि कठोर निर्बंधांसंबंधी निर्णय घेण्याची गरज असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी केंद्राने यावेळी सुचवले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टर इन्फेक्शनचे नमुने ताबडतोब INSACOG लॅबमध्ये पाठवले पाहिजेत, असेही सांगण्यात आले आहे. १०० टक्के लसीकरण होईल, यासाठी राज्यांनी जास्त प्रयत्न करावेत, असे यावेळी सुचवण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटल बेड्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन सामग्री, औषधे अशा आरोग्यासंबंधी पायासुविधांसाठी आपत्कालीन निधीचा वापर करण्यासंबंधीही सुचवण्यात आले आहे.