भाजपच्या १२ आमदारांचा निलंबन कालावधी कमी करण्यासाठी विधानसभा उपाध्यंक्षांना विनंती


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांना दिलासा देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाकडून अंतरिम दिलासा न मिळाल्यामुळे आता आमदारांना चालू अधिवेशनात सहभागी होता येत नाही. पण, विधानसभा सचिवांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

त्यानंतर आता निलंबन कालावधी कमी करण्‍यासाठी निलंबित आमदारांनी विधानसभा उपाध्‍यक्षांना विंनती पत्र लिहिले आहे. याबाबतची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते.

त्यानंतर हे निलंबन कमी करण्यासाठी आता १२ आमदारांनी विधानसभा उपाध्‍यक्षांना विंनती पत्र लिहिले आहे. आम्‍हाला ज्‍या मतदारांनी त्‍यांचे प्रश्‍न मांडण्‍यासाठी विधानसभेत निवडून दिले त्‍या मतदारांचे प्रश्‍न आम्‍हाला निलंबित असल्‍यामुळे हिवाळी अधिवेशनात मांडता येणार नाहीत. त्‍यामुळे मतदारांवर अन्‍याय होऊ नये म्‍हणून आमच्‍यावर करण्‍यात आलेल्‍या निलं‍बनाच्‍या कारवाईच्‍या एक वर्षांच्‍या कालावधीचा फेर विचार करण्‍यात यावा, अशी विनंती करणारे पत्र भाजपच्‍या १२ आमदारांनी विधानसभा उपाध्‍यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले आहे.

भाजपच्‍या बारा आमदारांना विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात एका वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले होते. या निलं‍बनाविरोधात भाजप आमदार आशिष शेलार आणि ११ आमदारांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली असून ११ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्‍यावेळी न्‍यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि विधिमंडळाला आपली बाजू मांडण्‍यास सांगितले आहे.

दरम्‍यान, न्‍यायालयाने ही याचिका दाखल करुन घेताना या आमदारांचा आपल्‍या निलंबनाचा कालावधी कमी करण्‍यासाठी विधानसभा अध्‍यक्षांना विनंती करण्‍याचा अधिकार अबाधित ठेवला होता. त्‍यानुसार आमदार आशिष शेलार यांच्‍यासह १२ आमदारांनी प्रत्‍येकांनी स्‍वतंत्रपणे पत्र लिहून विधानसभा उपाध्‍यक्षांना विनंती केली आहे.