विलीनीकरण करारावर ZEE आणि Sonyची स्वाक्षरी


मुंबई – मागील खूप दिवसांपासून झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SPNI) मध्ये विलीन होईल अशी चर्चा होती. अखेर बुधवारी, ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड बोर्डाने बोली करारावर स्वाक्षरी केली आहे. झी एंटरटेनमेंटने सांगितले की, २१ डिसेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेज लिमिटेड (ZEEL), बांग्ला एंटरटेनमेंट अ‍ॅण्ड प्राइवेट लिमिटेड (BEPL) आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील कराराच्या योजनेला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बोर्डाने त्यानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. सोनीची नवीन कंपनीमध्ये ५०.८६ टक्के हिस्सेदारी असणार आहे. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ZEEL च्या बोर्डाने सोनीमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली. बंधनकारक करार ZEEL आणि Sony Pictures यांच्यात करण्यात आला आहे. या कराराचा अर्थ असा आहे की आता झी फक्त सोनी पिक्चर्समध्ये विलीन होईल. पहिल्या ९० दिवसांच्या बंधनकारक नसलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या विलीनीकरणानंतर, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे ५०.८६ टक्के हिस्सा असेल. झीचे प्रवर्तक Essel ३.९९ टक्के आणि ZEEL ४५.१५ टक्के हिस्सा असेल. या विलीनीकरणानंतरही पुनीत गोयंका व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कायम राहतील.

पुनीत गोयंका या विलीनीकरणावर म्हणाले की, आमच्यासाठी हा मैलाचा दगड आहे. देशातील दोन मोठ्या मीडिया आणि मनोरंजन कंपन्यांच्या हातमिळवणीने एक युग सुरू होईल. या भागीदारीसह, आम्ही आमच्या ग्राहकांना विविध प्लॅटफॉर्मवर उत्तम सामग्री सेवा प्रदान करू. या भागीदारीनंतर, असा अंदाज आहे की ZEEL-Sony चा जाहिरात महसुलात २२ टक्के वाटा असेल. यासोबतच स्टार इंडियासोबतच या क्षेत्रातील कंपनीचा दबदबाही वाढणार आहे. तसेच, भागीदारीसह, दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ९१ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. नियामक भागधारक आणि तृतीय पक्षांच्या संमतीने दोन कंपन्यांमधील अधिकृत व्यवहार होईल. तसेच शेअर बाजारात कंपनी सूचिबद्ध होईल.