सतत प्रकाशझोतात असणाऱ्या अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा; मुंबईच्या महापौरांचा खोचक सल्ला


मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर शब्दांमध्ये शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरुन पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. रश्मी ठाकरे या कधीही राजकारणात नसताना त्यांचे नाव चंद्रकांत पाटील टीका करताना का घेतात, असा सवाल उपस्थित करत सतत प्रकाशझोतात असणाऱ्या अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा असा खोचक सल्लाही पेडणेकर यांनी दिला आहे.

राज्यात आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. पण चंद्रकांत पाटील यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला. पाटील यांनी मंगळवारीही अशीच टीका केली होती. याच टीकेसंदर्भात पत्रकारांनी महापौर पेडणेकर यांना, रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद जाईल, अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्याचा प्रश्न विचारला असता महापौरांनी त्यावर सविस्तर उत्तर दिले.

चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत. पण मला कधी कधी त्यांची किव करावीशी वाटते. त्यांच्याबद्दल माझ्यासारख्यांनी असे बोलणे चुकीचे आहे, असे माझे संस्कार सांगतात. एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी नाही बोलले पाहिजे, असे माझ्या पालकांचे, गुरुंचे आणि बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण ते जर एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील, तर अमृता फडणवीस यांना ते विरोधी पक्षनेता करणार आहेत का, हे सांगावे. कारण अमृता फडणवीस या जास्त प्रकाशझोतात आहेत. रश्मी वहिनी कधीच प्रकाशझोतात नसतात, तरी त्यांचे नाव घेतले जाते, असे म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.

पेडणेकर यांनी पुढे बोलताना थेट पंतप्रधान मोदींची यासंदर्भात भेट घ्यावी लागेल, असेही वक्तव्य केले. अरे तुम्हाला कळते का? तुम्ही एखाद्या स्त्रीचे किती हनन कराल? एक वेळेस आदित्य ठाकरेंचे नाव घेणे समजून शकते, ते मंत्री आहेत. पण रश्मी वहिनींचे नाव का घेता? त्यात तर राजकारणात कधीच नसतात. तुमच्या फडणवीस बाई आहेत ना, त्या प्रकाशझोतात आहेत. मग त्यांना बनवा ना विरोधी पक्षनेता. महिलांची नावे कशाला घेता. हे अजिबात चालू देणार नाही. हे काय चालले आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती खाली आणणार आहात? आता याच कामासाठी आम्हाला पंतप्रधानांची भेट घ्यावी लागेल. तुमची भारतीय जनता पार्टी हिंदू म्हणून पुढे येते, पण महिलांचे हनन करणे ही हिंदू संस्कृती नसल्याचे पेडणेकर म्हणाल्या.