तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला बसला ‘जबर’ धक्का!


जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेसाठी भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्किया बाहेर पडला आहे. नॉर्किया दुखापतींशी झुंज देत असल्याची माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ट्वीट करून दिली. नॉर्किया अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दुखापतीमुळे ​​तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.


नॉर्किया मालिकेबाहेर झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीला मोठा फटका बसणार आहे. तो काही काळ संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी यांच्या बरोबरीने, तो प्रोटीज संघाच्या वेगवान आक्रमणाला धार लावत असे. नॉर्कियामध्ये १५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चेंडू सातत्याने टाकण्याची क्षमता आहे. त्याने आतापर्यंत देशासाठी १२ कसोटी, १२ एकदिवसीय आणि १६ टी-२० सामने खेळले आहेत.

नॉर्किया २०२१ मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. यावर्षी त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये २५ विकेट घेतल्या. २०१९ मध्ये त्याने भारताविरुद्धच्या पुणे कसोटीतून पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेत भारताविरुद्ध त्याने अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही. नॉर्कियाने नुकतीच आयपीएल २०२१ स्पर्धा खेळली. तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. या संघासाठी त्याने अप्रतिम कामगिरी केली. यामुळे दिल्लीने त्याला आयपीएल २०२२ पूर्वी रिटेन केले आहे.