भारतीय वंशाच्या 36 वर्षीय आम्रपाली गन OnlyFansच्या नव्या सीईओ


मुंबई : भारतीय वंशाच्या लोकांची वर्णी जगभरातील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये लागत असताना त्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतीय वंशाच्या आम्रपाली गन यांची सबस्क्रिप्शन आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या OnlyFansच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत आम्रपाली गन यांचा जन्म झाला असून त्या केवळ 36 वर्षांच्या आहेत. कंपनीचे संस्थापक टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्रपाली गन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 21 डिसेंबरपासून आम्रपाली गन यांची या पदावर निवड झाल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या आधी OnlyFans या कंपनीत आम्रपाली गन यांनी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या विभागाच्या प्रमुखपदी काम केले आहे. यापूर्वी रेड बुल आणि क्वेस्ट न्युट्रिशन या कंपन्यांमध्ये आम्रपाली गन यांनी मोठी पदे सांभाळली आहेत.

2016 साली OnlyFans या सबस्क्रिप्शन आधारित असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची टिम स्टोकली यांनी स्थापना केली होती. टिम स्टोकली यांनी आपला पदभार आम्रपाली गन यांना सोपवताना म्हटले की, आम्रपाली या कंपनीच्या सहकारी आणि चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनी चांगली प्रगती करेल, असा विश्वास आहे.

हॉवर्ड बिजनेस स्कुलमधून आम्रपाली गन यांचे शिक्षण झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हरसिटीमधून पब्लिक रिलेशन अॅन्ड ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी एफआयडीएम या संस्थेतून मर्केन्टाईज मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.