पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी


मुंबई – विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील वीजजोडणी आणि कनेक्शन कापण्याच्या मुद्द्यावरून लक्षवेधी चर्चेदरम्यान आधी पंतप्रधानांनी नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे वक्तव्य केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरून सभागृहात विरोधकांनी गोंधळ सुरू केला.

भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभागृह काही काळ तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. पण, त्यांनी त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीसांना टोला लगवला.

विरोधी सदस्यांकडून मी माफी मागावी असा आग्रह होत आहे. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहात अनेकवेळा आले. एखाद्या गोष्टीसाठी माफी मागितल्यामुळे माणूस लहान होतो, असे नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. कोणताही असंसदीय शब्द मी वापरलेला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो, शब्द मागे घेतो म्हटले, तर देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. पण या सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालायचे असेल आणि मी पंतप्रधानांबद्दल बोलल्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. पूर्वी जे पंतप्रधान बोलले होते, तोच मी उल्लेख केला, तरी देखील मी माफी मागतो, असे भास्कर जाधव म्हणाले.

कोणताही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितली. पण विरोधी पक्षनेत्यांनी संगितले की आम्ही हक्कभंग आणणार आहोत. त्यांनी जरूर आणावा, मी त्यासाठी तयार असल्याचे आव्हान देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.

दरम्यान सुधीर मुनगंटीवार ऊर्जा विभागाच्या लक्षवेधीमध्ये भाष्य करत होते. त्यांच्या मुद्द्यांना नितीन राऊत उत्तर देत होते. त्यांनी उल्लेख केला की पंतप्रधानांनी देखील ५० लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू असे सांगितले होते. त्यावर फडणवीसांनी हरकत घेतली. त्यांची हरकत बरोबर होती. आम्ही एकाच शाळेत थोडेफार शिकलो आहोत. ते वरच्या वर्गात गेले, आम्ही खालच्या वर्गात आहोत. त्यांनी शब्दच्छल केला. ते म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बोलले नाहीत. अर्थात मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी प्रचाराच्या सभांमधून हे बोलले, असे म्हणत भास्कर जाधवांनी फडणवीसांना टोला लगावला.

तेव्हा विरोधी पक्षनेते जे बोलले, तेच मी बोलले. ते बोलताना त्यांचे म्हणणे मी अंगविक्षेप केला. सामान्यपणे मी बोलत असताना माझे हातवारे होतात, हलणे होते. पण तरीदेखील मी बोलण्याच्या ओघात माननीय पंतप्रधानांची नक्कल केली असेल. त्यांनी माझ्यावर हा आक्षेप घेतलेला नाही, की भास्कर जाधव यांनी कुठल्याही प्रकारे असंसदीय शब्द वापरला. २७-२८ वर्षांत सुधीर मुनगंटीवारांवर अनेकदा माफी मागायची वेळ आली आहे. विलास पाटील अध्यक्षस्थानी असताना ते काय बोलले होते, हे मला माहिती असल्याचेही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.