लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अक्षय कुमारचा बहुचर्चित राऊडी राठोडचा सिक्वेल


बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांचे सिक्वल येणे ही गोष्ट काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित राऊडी राठोडचा सिक्वेल येणार आहे. विशेष म्हणजे राऊडी राठोड २ या चित्रपटाची तयारीही सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील लेखक के. व्ही विजयेंद्र प्रसाद हे काम करत आहेत. या वृत्ताला त्यांनी स्वतः दुजोरा दिला आहे.

चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबिना खान यांनी फार पूर्वीच राऊडी राठोड या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग २०२० मध्ये सुरू होणार होते. पण कोरोनामुळे हा चित्रपट रखडला होता. पण हा चित्रपट आता प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे.

यासंदर्भात ‘मिड डे’ या वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर के. व्ही विजयेंद्र सध्या काम करत आहेत. लवकरच ते चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करणार आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे शुटींग सुरु केले जाईल, असे सांगितले जात आहे. राऊडी राठोड २ मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पण दुसऱ्या भागाची कथा पहिल्या चित्रपटाच्या शेवटापासून सुरू होणार नाही. ती त्यापेक्षा वेगळी असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान 2022 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी अक्षय कुमार आणि सोनाक्षी त्यांच्या आगामी अनेक चित्रपटांचे शूटिंग करताना दिसत आहे.