हा देश भाड्याने घेणार तुरुंग

डेन्मार्कने त्यांच्या देशातील तुरुंगात कैद्यांची संख्या खूप वाढल्याने तुरुंग भाड्याने घेण्यासाठी कोसोवी बरोबर करार केला आहे. त्यानुसार या तुरुंगातील ३०० कोठड्या ५ वर्षासाठी भाड्याने घेतल्या जाणार असून त्यापोटी दरवर्षी १५ दशलक्ष युरो म्हणजे १.२८,१७,२०,००० रुपये भाडे म्हणून दिले जाणार आहेत. या संदर्भात दोन्ही देशात नुकताच करार झाला आहे. डेन्मार्क कोसोवोला ग्रीन एनर्जी फंड गोळा करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे.

या संदर्भात बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार डेन्मार्क या तुरुंगात निर्वासित कैदी पाठविणार आहे. तुरुंगात डेन्मार्कचे कायदे लागू असतील. कोसोवो तुरुंगात सध्या ७०० ते ८०० बराकी रिकाम्या आहेत. त्यातील ३०० डेन्मार्क भाड्याने घेत आहे. २०२३ पासून कोसोवो राजधानी प्रीस्तीनापासून ५० किमी दूर असलेल्या गाझीलन तुरुंगातील बराकी पुढील १० वर्षे भाड्याने देऊन त्यातील २१० दशलक्ष युरोची कमाई करणार आहे.

डेन्मार्कच्या न्यायमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील तुरुंग आणि तुरुंग अधिकारी यांच्यावरील बोजा यामुळे कमी होणार आहे. तडीपारीची शिक्षा झालेल्या निर्वासित नागरिकांना डेन्मार्क तुमची भविष्यातील जागा नाही असा संकेत यातून दिला जात आहे. अर्थात कोसोवोने दहशतवादी, गंभीर रोग झालेले कैदी त्यांच्या देशातील तुरुंगात पाठविता येणार नाहीत अशी अट घातली आहे. तुरुंग भाड्याने घेण्याची कल्पना नवीन नाही. यापूर्वी नॉर्वे, बेल्जियम देशांनी नेदरलंड मधील तुरुंग भाड्याने घेतले होते.