हृतिकची बुर्ज खलिफावर बाईक राईड, झाला ट्रोल
बॉलीवूड सुपरहिरो हृतिक रोषन याने जगातील सर्वाधिक उंच इमारत दुबईतील बुर्ज खलिफावर फारच खतरनाक रीतीने बाईक राईड घेतली असून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. मात्र याबद्दल हृतिकचे कौतुक होण्याऐवजी चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ८३० मीटर उंच आणि १६३ मजली बुर्ज खलिफावर हृतिक याने बाईक चालविली आणि तो बाईकवरून इमारत उतरून खाली आला. हृतिक ‘माउंटन ड्यू’ ड्रिंकचा ब्रांड अँबेसीडर आहे. या जाहिरातीची टॅग लाईन ‘ डर के आगे जीत है’ अशी आहे. याच पेयाच्या नव्या जाहिरातीसाठी हृतिकने हा स्टंट केला. हृतिकची ओळख ग्रीक गॉडसारखे लुक, उत्तम डान्सर आणि अॅक्शन हिरो अशी आहे.
हृतिकने सोशल मिडीयावर बुर्ज खलिफा बाईक राईड व्हिडीओ शेअर केल्यावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले असले तरी विशेष म्हणजे ही जाहिरात वारंवार पाहिली जात आहे. आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर तिला ४,२८६,६५९ व्ह्यूज मिळाले असून १,१५५,३८८ लाईक्स मिळाले आहेत.
दुबई मधील ही इमारत ब्रिटीश आर्किटेक्ट अॅड्रीन स्मिथ याने डिझाईन केली होती. सुरवातीला तिचे नाव बुर्ज टॉवर असे होते पण इमारत उभी करण्यासाठी अबूधाबीचे प्रेसिडेंट खलिफा बिन जायद यांची मदत घेतली गेल्याने तिचे नाव बुर्ज खलिफा असे ठेवले गेल्याचे सांगितले जाते.