राजकुमारी हया ला घटस्फोटाबद्दल मिळणार ५५०० कोटी रुपये

युएईचे पंतप्रधान आणि दुबई शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना त्यांची पत्नी राजकुमारी हया हिला घटस्फोट दिल्याबद्दल ५५०० कोटी रुपये द्यावे लागणार असून जगातील हा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. त्याचबरोबर राजघराण्याची अलिशान जीवनशैली सुद्धा जगासमोर आली आहे. ब्रिटीश न्यायालयाने मंगळवारी राजकुमारी हया आणि तिच्या दोन मुलांसाठी ५५४ दशलक्ष पौंड म्हणजे ५५०० कोटी रुपये देण्याचे आदेश अल मकतूम यांना दिले आहेत. त्यामुळे दीर्घ काळ चाललेली ही कायदेशीर लढाई आता संपणार आहे. ब्रिटीश इतिहासात हा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.

युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी २००४ मध्ये राजकुमारी हया हिच्यासोबत निकाह केला होता. त्यांचे हे सहावे लग्न होते. मात्र दोन मुले झाल्यावर त्यांनी हया यांना २०१९ साली शरीया कायद्यानुसार अचानक घटस्फोट दिला होता. तेव्हापासून राजकुमारी हया त्यांच्या दोन मुलांसह ब्रिटन मध्ये राहत आहेत. त्यांच्या मालकीच्या १२ अलिशान हवेल्या, ४०० दशलक्ष पौंड किमतीचे अलिशान जहाज, खासगी विमानांचा ताफा आहे. ७२ वर्षीय मकतूम यांनी ४७ वर्षीय हया यांना घटस्फोट देण्यामागे हया यांचे त्यांच्या बॉडीगार्ड बरोबर अफेअर असल्याचा संशय कारणीभूत आहे असे सांगितले जाते. हे अफेअर लपविण्यासाठी हया यांनी मुलांच्या बँकेतून ६.७ दशलक्ष पौंड काढून खर्च केले होते असा आरोप होता.

राजकुमारी हया यांनी घटस्फोट भरपाई म्हणून १४ हजार कोटींची मागणी केली होती असेही समजते.