इतिहासात उद्धव ठाकरेंची नोंद सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून होईल – निलेश राणे


कुडाळ – आज राज्यातील १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपकडून याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकमेकावर टीका टिप्पणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अशाच प्रकारची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. इतिहासात सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची नोंद होईल, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

या (तालुक्यातील) सगळ्या म्हणजेच चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य मिळेल. आमचे सगळे नगरसेवक जिंकतील. आमच्या चारही नगरपंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे. विरोधकांनी किती भानगडी लावायचा प्रयत्न केला, कितीही भांडणे लावायचा प्रयत्न केला, तरी त्यांची उंची आणि अक्कल तेवढीच असल्यामुळे ते फक्त भानगडी लावायचा प्रयत्न गेली दोन दिवसापासून करत आहेत. पण आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये, निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करत असल्याचे निलेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

आपल्याला विकास हवा आहे. भांडण नको आहेत. पण शिवसेना असेल किंवा विरोधक असतील, त्यांना भानगड हवी आहे, विकास नको आहे, हाच काय तो फरक आहे. या चार पैकी एकही त्यांची नगरपंचायत नसल्यामुळे बोगस आमदाराने विजयाची वार्ता करू नये. येणाऱ्या निकालाच्या दिवशी चारही नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल, अशा शब्दांमध्ये निलेश राणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

एवढ्या दिवस प्रचारामध्ये काय भाषण केले? भाषणांमध्ये त्यांनी किती निधी आणला हे सांगता आले नाही. शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगून उपयोग नाही. ते त्यांच्या पॅम्प्लेटमध्ये पाहिजे होते. रस्त्यासाठी एवढा अमुक अमुक निधी, विकास कामांसाठी किती निधी आणला सांगू शकले नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काही उपयोग नाही. ४० दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. त्यांचे आमदार देखील काय कामाचे आहेत? त्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्र्याच्या वार्ता करू नका. निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासात झाली, तर ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल, अशी टीका निलेश राणे यांनी केली.